Friday, February 3, 2012

वाटले माझे मला जे, माझे न आता राहिले

चाललो वाटा अनेक, कधी सरळ कधी बिकट
नियतीचे झेलीत हास्य, कधी स्मित कधी विकट

जमून आले काही कधी, कधी सारेच बिघडले
काय हरवले काय गवसले, हिशोब ना परी मांडले

कधी तरंगलो कधी बुडालो, उसळुनी पुन्हा पुढे निघालो
जलौघातल्या कणासारखे, सहजस्वभावे सततच जगलो

बंधनापासून साऱ्या, मुक्त होती जिंदगी
सौख्य कलंदर आयुष्याचे, देत होती जिंदगी

भेटलीस तू अन, मीच मजला विसरलो
नकळत सारे होवून गेले, तुझ्यात पुरता गुंतलो

बदलूनी गेले विश्वची माझे, दिलेस किती तू नवे ऋतू
मन हे माझे म्हणे स्वतःशी, माझीच तू माझीच तू

वाटे जगणे तुझ्याचसाठी, तूच सोबती सदा असावे
दूर सारुनी भिन्नपणाला, एकरूप ते होवून जावे

एकरूप पूर्ण होण्या, बंधनात लौकिक बांधलो
जी तुझी तीच माझी, एक वाट चाललो

चालताना परी पुढे, विस्तारत गेल्या दिशा
नित्य नव्या मृगजळाच्या, मनी जागवीत आशा

दूर सोनेरी झळाळी, मृगजळाची आस लागली
हात सावरते अव्हेरणारी, धाव तुझी अंध झाली

धावताना बंध सारे, सहज तू ओलांडले
वाटले माझे मला जे, माझे न आता राहिले

फोलपणावर बंधनांच्या, हासून पुढे मी चाललो
ते कधी नव्हतेच माझे, मानून पुढे मी चाललो

------------- उत्कर्ष

No comments:

Post a Comment