Wednesday, January 18, 2012

तुझ्यासारख्या!

तशा तुझ्या आठवणी बेशिस्तच होत्या


तुझ्यासारख्या!


बोलावल्याशिवाय,वाटेल तेंव्हा आणि


बहुधा उशीराच येणार्‍या


मग उशीरापर्यंत रेंगाळणाऱ्या.


कुणाहि समोर मला निर्लज्ज बिलगणार्‍या.

...

तशा तुझ्या आठवणी जरा कडवटच होत्या

मध्यरात्रीच्या कॉफीच्या चवीसारख्या!

(ही कॉफीची सवय तू लावलीस!)

आता कॉफीमुळे आठवणी येतात की

आठवणीमुळे कॉफी होते

कोण जाणे!

...

तशा तुझ्या आठवणी मजेदारच होत्या

तुझ्यासारख्या!

तू नाही का जाताना उशीखाली

एखादं चॉकलेट ठेवून जायचीस.. विसरल्यासारखं दाखवून!

(तू वाचतांना पुस्तकात वाचनखूण म्हणून

चॉकलेटच ठेवलेलं असायचं)

तुझ्या आठवणी अजूनही जातांना

उशीखाली एखादं स्वप्न ठेवून जातात.

...

आता तुझ्या आठवणी 'समंजस' झाल्यात

अनलाईक यू!

चार,चार दिवस गायब झाल्यावर

आल्या आल्या, न आल्याची कारणं सांगत बसत नाहीत!

मुख्य म्हणजे त्यांना हवं तेंव्हा आणता येतं

आणि 'थांबा' म्हटल्यावर थांबतात.
...

आठवणी,कॉफी,चॉकलेट अन स्वप्नं..अजून सर्व तसेच आहेत.

माझ्याशी एकनिष्ठ!

तुझ्या बाबतीत मात्र आताशा तशी खात्री देता येत नाही..



No comments:

Post a Comment